स्पर्धकांमध्ये नव्हे तर वाहिन्यांमध्ये पाहायला मिळणार 'कांटे की टक्कर'

झी मराठी,कलर्स मराठी स्पर्धकांमध्ये नव्हे तर वाहिन्यांमध्ये पाहायला मिळणार 'कांटे की टक्कर' Source : Press

मराठी प्रेक्षकांना १३ नोव्हेंबरपासून सुरांची मैफल पाहायला मिळते आहे. 'झी मराठी' आणि 'कलर्स मराठी' या दोन्ही वाहिन्या संगीतमय कार्यक्रम आपल्या भेटीस घेवून आल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे एकाच वेळी, एकाच दिवशी हे रिअलिटी शो सुरु आहेत. त्यामुळे फक्त स्पर्धकांमध्येच नाही तर या दोन वाहिन्यांमध्येही 'कांटे की टक्कर' पाहायला मिळते आहे.

'चला हवा येऊ द्या' ने निरोप घेतल्यानंतर याठिकाणी 'सा रे ग म प'च्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. 'सा रे ग म प'चे नवे पर्व सुरु होणार हे कळताच सगळ्यांना उत्सुकता होती, ती 'सा रे ग म प' मध्ये परीक्षकांच्या भूमिकेत कोण दिसणार याची. यासोबतच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोण करणार असा प्रश्नही प्रेक्षकांना पडला होता. 'सा रे ग म प'चे सूत्रसंचालन म्हटले की डोळ्यासमोर उभी राहते ती पल्लवी जोशी. मग यंदा पल्लवी सूत्रसंचालकाच्या भूमिकेत झळकणार का याची उत्सुकता ही प्रेक्षकांमध्ये होती. पण, यंदा पल्लवी नाही तर 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' मधला सर्वांचा लाडका रोहीत राऊत हा सूत्रसंचालकाच्या भूमिकेत झळकणार आहे. तर 'नटरंग', 'बालगंधर्व' असे सुपरहीट सिनेमा देणारा आणि 'न्यूड' सिनेमावरुन चर्चेत असलेला दिग्दर्शक रवी जाधव आणि सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'घे पंगा, कर दंगा' अशी यंदाच्या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे.

कांटे की टक्कर

तर दुसरीकडे 'सा रे ग म प'च्या या टीमला आव्हान देत कलर्स मराठीही तगडी स्टार्स कास्ट घेवून 'सूर नवा, ध्यास नवा' हा संगीतमय नजराणा आपल्यासमोर सादर करत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने 'होणार सून मी ह्या घर'ची जान्हवी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. ती पहिल्यांदाच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेता महेश काळे, अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे या कार्यक्रमाचे परीक्षक असणार आहेत. वैशाली माडे, प्रसेनजीत कोसंबी, श्रीरंग भावे, जुईली जोगळेकर, ज्ञानेश्वर मेश्राम, प्रल्हाद जाधव यांच्यासह १५ गायक नवा सूर शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

कांटे की टक्कर

झी मराठीवर 'सा रे ग म प' हा कार्यक्रम सोमवार, मंगळवार हे दोन दिवस रात्री ९.३० वाजता तर दुसरीकडे याच वेळेला कलर्स मराठीवर सोमवार ते बुधवार ‘सूर नवा, ध्यास नवा हा कार्यक्रम पाहायला मिळेल.